Saturday, February 18, 2012

शिवजयंती २०१२ विशेष


स्त्रीस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते शिवराय



राष्ट्रीय एकतेचे प्रतीक : छत्रपती शिवराय

राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंनी ज्या महामानवाला संस्काराचे, राजनीतीचे, सर्वधर्मसमभावाचे, लोकशाहीचे बाळकडू देऊन आई आणि गुरू या दोन्हींची भूमिका पार पाडली आणि या शिदोरीच्या जोरावर ज्या महामानवाने हजारो वर्षे गुलामगिरीच्या खाईत पडलेल्या समाजाला नवी दिशा दिली, असे बहुजनांचे उद्धारकर्ते, स्वराज्य संस्थापक, क्षत्रीयकुलवंशज छत्रपती शिवाजी महाराज यांची 382 वी जयंती आज संपूर्ण भारतामध्ये मोठय़ा उत्साहात साजरी होत आहे.

संपूर्ण भारताचा श्वास असलेल्या छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रात आत्मसन्मानाची आग पेटवत स्वराज्य घडवण्याचे महान असे कार्य केले. 382 हा आकडाच राजांच्या लोकप्रियतेची साक्ष देतो. 382 वष्रे उलटून गेली तरीही जनसामान्यांच्या मनात राजांबद्दल असलेले प्रेम, र्शद्धा, सन्मान यामध्ये तिळमात्र कमतरता आलेली नाही. उलट दिवसेंदिवस ते प्रेम वाढतच चाललेलं आहे. आज जगामध्ये शिवरायांच्या विचारांचा, वेगवेगळ्या संकटांत त्यांनी वापरलेल्या शिवतंत्राचा, त्यांनी निर्माण केलेल्या न्यायव्यवस्थेचा, प्रशासनव्यवस्थेचा, त्यांनी घालून दिलेल्या सवयी-शिस्तीचा अभ्यास करून गोरे लोक स्वत:चा व त्यांच्या राष्ट्राचा विकास करून घेत आहेत, पण आपल्या देशात ‘दिव्याखाली अंधार’ अशी परिस्थिती आहे. भारतभूमीत शिवरायांनी विजयाचे घोडे चौफेर उधळवले, र्मद मावळ्यांचा ‘हर हर महादेव’चा नारा आजही महाराष्ट्राच्या दर्‍याखोर्‍यांत घुमतो आहे. स्वराज्याचे 350 किल्ले आजही राजांच्या पराक्रमाची साक्ष देत खंबीर उभे आहेत, पण आज त्याच शिवरायांचे वारसदार, भक्त म्हणवून घेणार्‍या आम्हा भारतीयांना शिवरायांचे खरे विचार अजूनही कळू शकले नाहीत हे आमचं दुर्दैव.

छत्रपतींची व अफजलखानाची लढाई राजकीय अस्तित्वाची लढाई होती. त्यांचे वैर धार्मिक नसून राजकीय होते. शिवरायांचा कोणी खानदानी शत्रू नव्हता. त्यांचा फक्त एकच शत्रू होता, अन् तो म्हणजे स्वराज्याच्या जो आड येईल तो नंबर एकचा शत्रू. मग तो घरचा असो वा दारचा, कोणत्याही जातीचा असो, वा धर्माचा. त्याला वठणीवर आणल्याखेरीज शिवराय स्वस्थ बसत नसत.

शिवरायांकडे येणारा प्रत्येक माणूस हा जातीवर नव्हे, तर तो स्वराज्यासाठी किती उपयोगी आहे या कसोटीवर पारखला जायचा. राजाकडे अठरापगड जातींचे लोक गुण्यागोविंदाने राहायचे. शिवरायांनी या लोकांना इतका जीव लावला की, या लोकांनी शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी पाण्यासारखं रक्त वाहिलं. हाडांची काडं करून शिवरायांचे हात स्वराज्य उभारणीसाठी मजबूत केले. इतकं बंधूप्रेम छत्रपतींनी या मावळ्यांना दिलं होतं.

आज खरोखर आपण स्वत:ला शिवरायांचे भक्त, त्यांचे वारसदार मानत असू तर आज आपण एक निश्चय करूया की, शिवरायांना कधीच कोणत्या जातीच्या चौकटीत कोंडायचं नाही. कोणतीच जात शिवरायांच्या आड येता कामा नये. आपण जर खरे शिवभक्त असू तर छत्रपती शिवाजी महाराज कोणाची मक्तेदारी नाही हे ठणकावून सांगणं आपलं आद्य कर्तव्य असेल. शिवरायांचा कार्यकाळ जर बघितला तर इ. स. 1630 ते 1680 या 50 वर्षांच्या काळामध्ये शिवराय रात्रंदिवस झिजत राहिले. कोणासाठी? तर तुमच्या-आमच्यासाठी, जनतेच्या कल्याणासाठी, प्रत्येक जाती-धर्मांच्या लोकांना आपलं, स्वत:चं वाटेल असं स्वराज्य निर्माण करण्यासाठी.

शेवटी आपण सर्व तरुण मंडळी या शिवजयंतीनिमित्त एक पक्का संकल्प करूया, खर्‍या शिवचरित्राचा अभ्यास करून राष्ट्रीय एकतेचं प्रतीक असणार्‍या शिवरायांचे विचार आत्मसात करूया

नवा भारत घडवूया..।।

देश महासत्ता बनवूया..।।

-गणेश गिरणारे पाटील

No comments: